बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी!

ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील भाष्याने जबरदस्त हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट!

सावंतवाडी:
शरीरसौष्ठवाच्या मैदानात शरीरसाधकांनी आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखविले, स्नायूंच्या पिळदार रेषांनी उपस्थितांची मने जिंकली; मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत युवा नेते विशाल परब यांनीही आपल्या वक्तृत्वाचा असा काही जलवा दाखविला की, उपस्थितांच्या नजरा आणि कान दोन्ही त्यांच्या भाषणाकडे खिळून राहिले! निमित्त होते भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आणि भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात आयोजित ‘भाजपा श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे! शरीराच्या सामर्थ्याची ही स्पर्धा असली, तरी त्या दिवशी शब्दांच्या मैदानात मात्र विशालभाईंनीच तुफानी फलंदाजी केली!

सामान्यतः दुसऱ्यांना अधिकाधिक बोलण्याची आणि स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व देण्याची भूमिका घेणारे विशाल परब एखाद्या व्यासपीठावर अवघ्या दोन-तीन मिनिटांत आपले मनोगत व्यक्त करून थांबतात. मात्र, यावेळी त्यांनी तब्बल नऊ मिनिटे आपल्या खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक वाक्यात आत्मविश्वास, प्रत्येक शब्दात कार्यकर्तृत्वाची जाणीव, तर प्रत्येक विधानात अचूक टायमिंग आणि राजकीय परिपक्वतेची झलक दिसून आली. वरिष्ठांचा आदर, सहकाऱ्यांचा सन्मान, भविष्यातील विकासाचे नियोजन आणि युवा पिढीसाठी काहीतरी नवे करण्याची धडपड अशा अनेक पैलूंनी त्यांच्या भाषणाला वेगळीच उंची प्राप्त झाली.

‘एक घाव दोन तुकडे’ नव्हे, तब्बल ४५ तुकडे! विनोद राऊळ यांच्या नावावर विशालभाईंचा भन्नाट षटकार!

भाषणातील सर्वाधिक रंगतदार क्षण ठरला तो भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांच्या उल्लेखाचा! निवेदकांनी विनोद राऊळ यांची तुलना ‘गदर’ चित्रपटातील सनी देओल यांच्या दमदार भूमिकेशी करत ‘एक घाव दोन तुकडे’ असा उल्लेख केला होता. हाच धागा पकडत विशाल परब यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत भन्नाट फटका मारला.

ते म्हणाले, “सन्माननीय निवेदकांना आणि उपस्थित बंधू-भगिनींना मी सांगू इच्छितो की, विनोद राऊळ साहेब म्हणजे एक घाव दोन तुकडे करणारे नव्हेत, तर तब्बल ४५ तुकडे करण्याची ताकद असलेले नेते आहेत! त्यांच्या आशीर्वादाचा आणि आमच्या पाठीवर असलेल्या हाताचा आधार आम्हाला भल्याभल्यांना समोरासमोर भिडण्याचे बळ देतो.”

या एका विधानाने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उसळला, तर टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

‘नायक’मधील अनिल कपूर नव्हे, सावंतवाडीचा विकास घडविणारे अनिल निरवडेकर!

यानंतर विशाल परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचाही आपल्या खास शैलीत उल्लेख केला. “अनिल निरवडेकर साहेब म्हणजे केवळ अभिनेता अनिल कपूर नव्हेत, तर ‘नायक’ चित्रपटातील एका दिवसात मुख्यमंत्री बनलेल्या अनिल कपूर यांच्याप्रमाणेच सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. पुढील चार वर्षांत शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास घडविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते या संधीचे सोने करतील, अशी अपेक्षा आहे,” असे सांगत त्यांनी अनिल निरवडेकर यांना विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या.

चित्रपटातील प्रसंगांचा संदर्भ, स्थानिक नेतृत्वाचा गौरव आणि भविष्यातील विकासाची अपेक्षा यांची सांगड घालत विशाल परब यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना खिळवून ठेवले.

युवकांसाठी नवी व्यासपीठे उभारण्याचा संकल्प; दोडामार्गातही बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा मानस!

यावेळी बोलताना विशाल परब यांनी सावंतवाडी मतदारसंघाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याची भूमिका मांडली. या स्पर्धेच्या आयोजनामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

सिंधुदुर्गातील युवकांना त्यांच्या कला, क्रीडा, कौशल्य आणि सामर्थ्याला वाव देणारी अधिकाधिक व्यासपीठे उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षीही अशाच भव्य स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करतानाच, आगामी काळात दोडामार्ग तालुक्यातही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

शरीरसौष्ठवाचा थरार आणि वक्तृत्वाचा जल्लोष!

या दिमाखदार सोहळ्याला भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपाचे नगरसेवक-नगरसेविका तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील नागरिकांनीही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी आणि निलेश गुरव यांनी केले, तर आभारप्रदर्शन नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केले.

एकीकडे शरीरसाधकांच्या पीळदार देहयष्टीचा थरार, दुसरीकडे क्रीडाप्रेमींचा उत्साह आणि त्यात विशाल परब यांच्या नऊ मिनिटांच्या भाषणातील अचूक टायमिंग शॉट्स… अशा तिहेरी संगमाने ‘भाजपा श्री २०२६’चा सोहळा संस्मरणीय ठरला. शरीराच्या मैदानात स्पर्धकांनी सामर्थ्य दाखविले, तर शब्दांच्या मैदानात विशाल परब यांनी आपल्या वक्तृत्वाची छाप उमटविली. त्यामुळे सावंतवाडीच्या राजकीय आणि क्रीडाविश्वात या स्पर्धेइतकीच चर्चा रंगली ती विशालभाईंच्या तुफानी बॅटिंगची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top