दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त

दिवाळी विशेष मोहिमेत १३ तपासण्या;१७ अन्न नमुने संकलित

सिंधुदुर्ग:
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, फराळ व अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. पाच दिवस चाललेल्या या मोहिमेत एकूण १३ तपासण्या करून १७ अन्न नमुने संकलित करण्यात आले. या कारवाईत संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत ४३ हजार ५८५ रुपये आहे.

या मोहिमेदरम्यान कुडाळ येथे ९८ किलो मावा, किंमत ३९ हजार २०० रुपये, तर कणकवली येथे ६ किलो खवा, किंमत २ हजार १४५ रुपये जप्त करण्यात आला. याशिवाय कणकवली येथे ३ किलो पोहा चिवडा आणि ५ किलो शेव चिवडा, असा एकूण ८ किलो फराळाचा साठा, किंमत २ हजार २४० रुपये, जप्त करण्यात आला.

मोहिमेत मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, खवा-मावा, मिठाई आणि फरसाण यांचे नमुने घेण्यात आले. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधित विक्रेते व उत्पादकांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग यांनी दिली.

नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना दक्षता घ्यावी

सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई व फराळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे, अन्नपदार्थांची मुदत तपासावी तसेच अनैसर्गिक गडद रंगाचे पदार्थ खरेदी करणे टाळावे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याची शंका आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top