शिरशिंगे–शिवापूर घाटमाथा रस्त्यासाठी महत्त्वाची पावले

जमिनीची वर्गवारी पूर्ण, रस्त्याचा मार्ग मोकळा

कुडाळ प्रतिनिधी
सावंतवाडी–कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा घाटमाथ्यावरील कलंबिस्त–शिरशिंगे–शिवापूर मार्गाचा रस्ता लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी संदर्भातील प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
शिवापूर गावचे कुडाळ पंचायत समिती माजी सभापती मोहन सावंत, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी विभागाचे शाखा अभियंता लोहार शिरशिंगे गावचे सावंतवाडी तालुका शिवसेना उप तालुका प्रमुख जीवन लाड, कोल्हापूर येथे स्थायिक असलेले उद्योजक अरुणभाई गुंजाळ, कोल्हापूर येथे मुख्याध्यापक असलेले मनोज शेडगे, जीएसटी विभागाच्या असिस्टंट कमिशनर सौ. मानसी शेडगे, यांच्या परिचयातून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती सोनवणे मॅडम यांची भेट घेतली.
या बैठकीत शिरशिंगे–शिवापूर जोडणाऱ्या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची आवश्यक पर्यायी जमीन फॉरेस्ट नावावर करण्यात आले असून त्याचा सातबारा तयार करण्यात आला. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी असलेली प्रशासकीय अडचण दूर झाली असून आता या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा महत्त्वाचा रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे , सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे , आमदार निलेश राणे तसेच तत्कालीन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यांना जोडणारा हा घाटमाथ्यावरील रस्ता पूर्ण झाल्यास शिरशिंगे, शिवापूर आणि परिसरातील गावांच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक ग्रामस्थांसाठी हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top