कर्तृत्ववान नारीशक्तीचा सर्वोदय नगरमध्ये सन्मान !

अनुश्री राणे ठरल्या पैठणीच्या प्रथम मानकरी!, जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

सावंतवाडी :
शहरातील सर्वोदय नगर येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या सहभागामुळे आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग प्राप्त झाला. या प्रसंगी सर्वोदय नगरचे नगरसेवक अजय गोंदावळे तसेच नगरसेविका सौ. नीलम नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर ईशस्तवन आणि स्वागत गीताने वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने स्वकर्तृत्ववान व स्वावलंबी महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महिला उद्योजिका सौ. ऋचा पाटणकर, सौ. सुनीता पावसकर, सौ. संयोगिता काळकुंद्रीकर, सौ. सुजल राऊळ आणि सौ. सपना पांढरे यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याची उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली.

सर्वोदय नगर रहिवासी संघाच्या महिला अध्यक्षा सौ. दिशा कामत यांनी आपल्या प्रस्तावनेत महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी समाजाच्या सर्व क्षेत्रांत पुढे यावे, आत्मविश्वासाने वाटचाल करावी आणि एकमेकांना आधार द्यावा, असा संदेश त्यांनी दिला. नगरसेवक श्री. अजय गोंदावळे व नगरसेविका सौ. नीलम नाईक यांनीही उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत समाजातील महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे प्रभावी शब्दांत मांडले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रा. रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले “खेळ पैठणी” स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन.
महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासाठी पैठणी साडीचे प्रायोजकत्व सर्वोदय नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी स्वीकारले, तर द्वितीय क्रमांकासाठी नगरसेविका सौ. नीलम नाईक यांनी प्रायोजकत्व केले.
स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक सौ. अनुश्री राणे, द्वितीय क्रमांक सौ. स्वाती दुबळे, तृतीय क्रमांक सौ. रोशनी गावडे, उत्तेजनार्थ क्रमांक सौ. मानसी पिळणकर आणि डॉ. सौ. दीप्ती बुवा यांनी पटकावला.

विजेत्यांचा उत्साह आणि उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर आनंदाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. अमृता धुरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. अनुश्री राणे यांनी मनोगत व्यक्त करून केले. कार्यक्रमातील अविस्मरणीय क्षण टिपण्याचे काम कु. सबिना डिसूजा व श्री. निनाद नाईक यांनी उत्कृष्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीद्वारे पार पाडले. सर्वोदय नगर संघाच्या सर्व कमिटी सदस्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाची सांगता नगरसेवक श्री. अजय गोंदावळे व सौ. मेघना राऊळ यांच्या सुरेल व अप्रतिम गायनाने झाली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले आणि महिला दिनाचा हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top