सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट

नगराध्यक्षा सौ.श्रद्धा भोसले यांनी मांडला विकासाचा भव्य आराखडा

सावंतवाडी प्रतिनिधी:
सावंतवाडी शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाचा कायापालट करण्यासाठी नगरपरिषदेने एक महत्त्वाकांक्षी आणि भव्य विकास आराखडा तयार केला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम राजे भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. आजवर मोती तलावाच्या विकासाबाबत रॉयल फॅमिली आणि सरकार यांच्यात काही प्रमाणात मतभेद होते; मात्र आता सर्व मतभेद बाजूला ठेवून, सर्वांना सोबत घेऊन या तलावाचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक विकास साधला जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासाठी शासन स्तरावरून मोठा पाठिंबा मिळत असून आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या विकासासाठी यापूर्वीच मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडूनही या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी भक्कम सहकार्य लाभत आहे. सर्व
घटकांनी एकत्र येऊन नियोजन केल्यामुळे मोती तलावाचा हा विकास प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि सावंतवाडीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

या नव्या विकास आराखड्यात पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने तलावाच्या परिसरात एक आकर्षक ‘व्ह्यूविंग डेक’ उभारण्यात येणार आहे, जिथे लोकांना बसून तलावाच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. याशिवाय, कोकणची लोककला असलेल्या दशावतार नाटकांचे सादरीकरण, पारंपरिक कंदील फेस्टिव्हल आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक भव्य ‘अॅम्फीथिएटर’ म्हणजेच उघडे नाट्यगृह विकसित केले जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक कलाकारांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल.

सावंतवाडीची ओळख ही पूर्वापार ‘कलाकारांची भूमी’ म्हणून राहिलेली आहे. याच ओळखीला उजाळा देण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध ‘काला घोडा’
फेस्टिवलच्या धर्तीवर मोती तलाव परिसरात तरुण आणि होतकरू कलाकारांसाठी विशेष प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाईल. तिथे तरुण कलाकार आपली चित्रे व इतर कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करू शकतील. यामुळे रोजगाराच्या शोधात मुंबई, गोवा किंवा दिल्ली सारख्या शहरांकडे होणारे स्थानिक तरुण कलाकारांचे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. यासोबतच, या प्रकल्पात खवय्यांसाठी फूड ट्रक्ससह ‘फूड प्लाझा’ आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले ‘बोटिंग’ पुन्हा एकदा नव्या नियोजनासह अत्यंत यशस्वीपणे सुरू केले जाणार आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top