यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा कोल्हापुरात विशेष गौरव

सीबीएसई बोर्डातील घवघवीत यश आणि शैक्षणिक योगदानाची दखल; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सावंतवाडी:
सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ चे नुकतेच शानदार आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विशेष सन्मान पटकावला. सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय आणि घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेचा गुणवंत विद्यार्थी सहर्ष सतीश धुमाळे याचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या यशासोबतच शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेची आणि मार्गदर्शनाचीही या सोहळ्यात प्रामुख्याने दखल घेण्यात आली. शाळेच्या शिक्षिका दीपिका रुपेश कदम यांना त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील निरंतर आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल इयत्ता दहावीच्या समन्वयक सोनाली अक्षय शेट्टी आणि मुख्याध्यापिका प्रियांका शशिकांत देसाई यांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या भव्य पुरस्कार सोहळ्याला सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष, मिरजचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रणील गिल्डा तसेच सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या अध्यक्षा सस्मिता मोहंती यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत भोसले आणि सचिव संजीव देसाई यांनी सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले असून, या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top