मराठा समाजाचे कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावरील कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून निषेध..!

जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत:सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप,सिद्धेश परब व कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठाम..

कुडाळ प्रतिनिधी
वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा मराठा कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावर अंमली पदार्थ सापडल्याच्या आरोपावरून वेंगुर्ला पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही कारवाई सूडभावनेतून तसेच मायनिंगविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे करण्यात आल्याचा आरोप महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास शं. सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सिद्धेश परब हे गेल्या दहा वर्षांपासून मराठा चळवळीशी जोडलेले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी राहिले आहेत. सामाजिक कार्याची त्यांची तळमळ मोठी असून समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तीवर अंमली पदार्थासारख्या गंभीर प्रकरणात कारवाई होणे ही बाब संशयास्पद असल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांनी म्हटले आहे.
मायनिंगविरोधातील लढ्याचा संदर्भ
सिद्धेश परब यांनी मायनिंगविरोधात लढा सुरू केला होता, असा उल्लेखही प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. या भूमिकेमुळे त्यांना विविध प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे

‘मायनिंग विरोधात आवाज उठवलाच्या इशाऱ्यावर कारवाई’चा आरोप
सिद्धेश परब यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही सूडभावनेतून करण्यात आली.असा गंभीर आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांनी केला आहे.
दरम्यान, परब यांच्यावरील आरोप व पोलिसांनी केलेली कारवाई याबाबत संबंधित तपास यंत्रणेकडून अधिकृत तपशील समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठा समाजबांधवांना एकजुटीचे आवाहन
या प्रकरणाचा निषेध अशा कठीण प्रसंगी सिद्धेश परब आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांनी समाजबांधवांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top