पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ

आरोग्य यंत्रणेने ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी प्राधान्य द्यावे – पालकमंत्री नितेश राणे

मेडिकल मोबाईल युनिट, व्हॅक्सिन व्हॅन पोहचणार गावागावात

सिंधुदुर्ग:
प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव ता.कणकवली येथे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि काही भागांतील दुर्गमता लक्षात घेता ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. दुर्गम भागांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचणे तसेच नेटवर्कच्या समस्या अशा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळविण्यासाठी अनेकदा अडचणी येतात. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने अशा अभियानातून नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी केल्या.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सिंधु जनसंवाद यात्रेतून जिल्ह्यातील सुमारे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गावागावात आरोग्य सेवा दिली जाणार आहे. नागरिकांनी आरोग्यसेवेसाठी यंत्रणेपर्यंत येण्याऐवजी आरोग्य यंत्रणेने नागरिकांपर्यंत पोहोचणे ही कौतुकास्पद आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. या आरोग्य यात्रेमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. या संकल्पनेला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही पसंती दर्शविली असून, महाराष्ट्रातील इतर भागांतही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला उपचारांसाठी इतर जिल्ह्यात जाण्याची वेळ येऊ नये, त्यांना जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा दृष्टिकोन ठेवून सर्वांनी काम करणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील रुग्णांना योग्य निदान आणि आवश्यक उपचार स्थानिक पातळीवरच मिळावेत, यासाठी शासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहेत. आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि डॉक्टरांची कमतरता दूर करणे, जिल्ह्यात उपलब्ध नसलेल्या उपचार सुविधा सुरू करणे तसेच आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही नागरिकांना आरोग्य शिबिरांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अशा नागरिकांपर्यंत आरोग्य यंत्रणेने स्वतः पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी मोबाईल आरोग्य युनिटच्या माध्यमातून दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केंद्र, राज्य तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून जिल्ह्याला गरजेच्या विविध आरोग्य विषयक योजना राबविण्यात येत असल्याचे सांगत कित्येक रुग्णांना उपचाराची सतत गरज असणाऱ्यांसाठी ही आरोग्य यात्रा महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रूहीता तांबे, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, सुप्रिया मेस्त्री, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, डॉ. सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच रविराज मोरजकर, पंढरी वायंगणकर, डॉ. पंकज पाटील, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, दिलीप तळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्यविषयक विविध लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top