कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी

नगरसेवक मंदार शिरसाट यांनी घेतली प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांची भेट

कुडाळ:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना MPSC, UPSC आणि इतर केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि कुडाळमधून भविष्यातील ‘क्लास १’ (Class 1) अधिकारी घडावेत, या उद्देशाने युवासेना जिल्हाप्रमुख व माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी एक महत्त्वाचे व सकारात्मक पाऊल उचलले आहे.
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सुसज्ज ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी आज मुंबई येथे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम हे देखील उपस्थित होते.

निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी संपूर्ण राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल अव्वल लागतो. येथील विद्यार्थी अत्यंत हुशार व कष्टाळू असूनही, ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन, आधुनिक ग्रंथालय आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने ते स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहतात. आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे क्लासेस लावणे शक्य होत नाही.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी आणि त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी यापूर्वी देखील मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून दोन विशेष मार्गदर्शन चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. आता कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि प्रमुख शैक्षणिक ठिकाण असल्याने येथे कायमस्वरूपी केंद्र सुरू झाल्यास जिल्ह्यातील हजारो गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळेल आणि प्रशासकीय सेवेत ‘क्लास १’ सारख्या उच्च पदांवर जाण्याची संधी उपलब्ध होईल.
या मागणीचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता प्र-कुलगुरू अजय भामरे यांनी या निवेदनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबईतील या भेटीदरम्यान संदीप म्हाडेश्वर, साई शिंदे आणि सागर तळेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top