समीर नलावडे यांच्या मालकीच्या घर नंबर- ३८९ च्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद.
कणकवली प्रतिनिधी
नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाली असून एक्स या सोशल मीडिया प्रसार माध्यमावरून आमदार निलेश राणे यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे. सोबतच कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याजवळ या प्रकरणाची तक्रार करत बोगस मतदारांची यादीही सादर केली आहे.
यात समीर नलावडे यांच्या मालकीच्या घर क्र- 389 मध्ये एकूण 6 मुस्लिम व्यक्तींची नोंद असून त्यात शेख साजिदा दाऊद, शेख दाऊद कादर, मुल्ला रहबत तैबा यासिन, उडीयान मुमताज अब्दुल यांचा समावेश आहे तर इतर सुजाता वासुदेव राठोड, सुहासिनी शशिकांत माणगावकर, रेणुका सुरेश जाधव व समीर नलावडे यांचे पुत्र राज समीर नलावडे हे घर क्रमांक 389 मध्ये राहत असल्याची नोंद मतदारयादीमध्ये आहे.
याशिवाय समीर नलावडे यांच्या प्रभाग क्रमांक-7 मध्ये एकूण 169 पेक्षा जास्त मतदार वाढल्याची नोंद असून यात केवळ तीन घरांमध्ये हे लोक राहत असल्याचे दाखवून त्यांना बोगस मतदार बनविले आहे.
याबाबत आमदार निलेश राणे यांनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याजवळ तक्रार केली असून या प्रकरणी संबंधित BLO ची चौकशी करण्याची तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
