सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हाच खरा मार्ग”…

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामतः भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चा भव्य शुभारंभ…

सावंतवाडी:
भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, समन्वयक प्रा. सिद्धेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी अशा प्रकारचा राष्ट्रीय महोत्सव संस्थेमध्ये प्रथमच आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. “प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान” हे ब्रीदवाक्य ठेवून जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करून विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावर या उपक्रमाचा विशेष भर असल्याचे त्यांनी नमूद केले. ले. कर्नल रत्नेश सिन्हा यांनी अशा उपक्रमांची मालिका राबवून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले. कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी आयोजन समितीचे अभिनंदन करत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे प्रमोद कामत यांनी कॉलेजच्या उपक्रमाचे कौतुक करत जिल्ह्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविणाऱ्या उपक्रमांना जिल्हा परिषदेतर्फे सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. टेक्निकल क्विझ, रोबो रेस, प्रोजेक्ट स्पर्धा, डिबेट आणि रील मेकिंग यांसारख्या स्पर्धांमुळे परिसरात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या सत्रात मेगा ऑटो शोला सुरुवात होणार असून स्पीड, पॉवर व स्टाईलचा थरार अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शृंखला नाईक तर आभार प्रदर्शन प्रा. सिद्धेश सावंत यांनी केले.दोन दिवस चालणारा हा तांत्रिक महाउत्सव विद्यार्थ्यांची कल्पकता, कौशल्य आणि नवसंकल्पनांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top