मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा

सिंधुदुर्गनगरी:
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या या शिबिराचा मुख्य उद्देश दुर्बल व वंचित घटकांतील रुग्णांना सर्व प्रकारच्या स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा आहे.दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर सहज उपलब्ध होत नसल्याने, पालकमंत्री नितेश राणे यांनी इतर जिल्ह्यांमधून स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची उपलब्धता करून दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरखडेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांनी मार्गदर्शन केले. विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते सल्ले व उपचार दिले.आजच्या शिबिरामध्ये एकूण ९४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सोनोग्राफी ७५, 2D इको (प्रौढ) ९६, 2D इको (बालक) ३४, रक्ततपासणी ३५९, एक्स-रे ९१, ईसीजी ८० आणि सीटी स्कॅन ३३ तपासण्या करण्यात आल्या.बालरुग्णांपैकी ४ बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच शिबिरामध्ये ९ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, ज्यामध्ये हर्निओप्लास्टी, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, एक्सिशन तसेच इतर उपचारांचा समावेश होता. याशिवाय पोटाच्या एंडोस्कोपी व टंग टायसारख्या विशेष उपचारांचाही समावेश होता.ठाणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून ३४ बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली, तर विविध नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञांनी कर्करोगासंदर्भात तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी, परिचारिका, लॅब कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांनी मोलाचे योगदान दिले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील पथकानेही सक्रिय सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top