गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठेतील रस्त्यांची डागडुजी

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी केली कामाची पाहणी

सावंतवाडी:
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत होणारी नागरिकांची व व्यापाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, या कामासाठी दोन दिवस बाजारपेठेतील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या संख्येने गणेशभक्त तसेच नागरिकांची वर्दळ वाढते. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नयेत, तसेच नागरिक व व्यापाऱ्यांना गैरसोय होऊ नये, यासाठी रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे.नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांनी आज नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.नगराध्यक्षांनी कामाच्या दर्जाबाबत विशेष सूचना देत अधिकारी व संबंधित कंत्राटदाराला रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.काम सुरू असताना वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच व्यापारी व नागरिकांनी दोन दिवस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top