सावंतवाडी प्रतिनिधी
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विक्रांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. त्यांच्या या उमेदवारीमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, तरुणांसह सर्व स्तरातील मतदारांमध्ये प्रचंड चैतन्य पाहायला मिळत आहे.
आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विक्रांत सावंत यांच्या समर्थकांनी सावंतवाडी येथे मोठी गर्दी केली होती. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या या रॅलीने विरोधकांचे लक्ष वेधून घेतले असून, मतदारसंघातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यांत शिक्षण, आरोग्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात विक्रांत सावंत यांनी सातत्याने भरीव कार्य केले आहे. त्यांची कार्यपद्धती, जनतेशी असलेला थेट संवाद आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर महायुतीची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली असून, त्यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विक्रांत सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माजगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. जनतेने दिलेल्या या अभूतपूर्व प्रेमाची परतफेड मी केवळ कामाच्या माध्यमातूनच करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी मतदारांना दिली. श्री. सावंत यांच्या उमेदवारीमुळे माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आता निवडणुकीची चुरस मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. माजी मंत्री स्व. भाईसाहेब सावंत व माजी सभापती स्व. विकास सावंत यांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचे काम विक्रांत सावंत करत असल्याने लोकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास दिसून येत आहे. एक प्रगतशील आणि सर्वसमावेशक विकासाचा चेहरा म्हणून मतदारांचा कल त्यांच्याकडे झुकताना दिसत असून, ही निवडणूक मतदारसंघाच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
