पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी:
जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी योजनेचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी स्वतंत्र बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देणे, शिवसृष्टी प्रकल्पाला गती देणे आणि देवगड नळपाणी योजना सुरळीत व दीर्घकालीन स्वरूपात कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल, पूजा इंगवले, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत, प्रभाकर सावंत, बुधावले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेताना पालकमंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी रस्त्यांची सर्व प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने खड्डे बुजविणे, मंजूर विकासकामांना गती देणे, जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक ती दुरुस्ती करणे तसेच भूसंपादनासारख्या विषयांमध्ये महसूल विभागाशी समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते प्रकल्पांची सद्यस्थिती, गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावयाच्या कामांचे नियोजन, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे, भूसंपादनाची प्रगती आणि इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

राजकोट शिवसृष्टी प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश

मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामांचा स्वतंत्र आढावा घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगाने करावी, असे निर्देश दिले. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक आणि पर्यटन वैभवात भर पडणार असल्याने कामात कोणताही विलंब होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवगड नळपाणी योजनेत सौरऊर्जेचा पर्याय तपासण्याच्या सूचना

देवगड नळपाणी योजनेच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना अखंड आणि गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जुन्या जलवाहिन्यांची तपासणी करून आवश्यक तेथे त्यांची दुरुस्ती किंवा बदली करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकासकामांदरम्यान नुकसान झालेल्या जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी महावितरणकडून अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा आणि भविष्यात ही योजना सौरऊर्जेवर चालविण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस राजेश कुलकर्णी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या या आढावा बैठकीत विकासकामांची गुणवत्ता, वेळेत अंमलबजावणी आणि नागरिकांना अधिक प्रभावी सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top